कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले, सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परिस्थिती
कुर्डूवाडी: उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहेत. सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज जवळपास साडेपाचशे कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे, चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रुपये, तर सर्वसाधारण कांद्याला 1500 ते 2000 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. तर, मागील महिन्याभरात कांद्याचे दर निम्म्याहून घसरले आहे. मागील महिन्यात कांद्याला जवळपास पाच ते सात हजार रुपये भाव होता. मात्र, एका आठवड्यात जवळपास 3 हजार गाडी कांद्याची आवक सोलापूरच्या बाजारात झाल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सध्या कांद्याचे दर खूप कमी झाले आहेत. आभाळ आल्याने शेतकरी घाबरून कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहे. पाऊस पडल्यास काद्यांचे नुकसान होते आणि त्याला 1 हजार रुपयांचे देखील दर मिळणे अवघड असते. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत आहे. तर, बाजारात यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दर प्रचंड घसरले असल्याची माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया…
कांद्याचे दर निम्म्याहून खाली पडले आहेत. जिथे 5000 ते 5500 रुपयांचा भाव होता, त्याच कांद्याला आज 1800 रुपयांचा भाव मिळत आहे. मोदी सरकारने 40 टक्के शुल्क लावल्याने कांद्याचे बाजार भाव पडले आहे. आज 2000 च्या आतमध्येच कांद्याला दर मिळत आहे. मार्केटमध्ये 3000 ते 4000 चा भाव सांगितला जातो. यात येण्या-जाण्याचा खर्च देखील निघत नाही. काट्याला 100 पोते प्रमाणे पैसे मागतात, तीनशे रुपये रोजगाराला जातात. अशात कांदा 500 आणि 1200 रुपयांनी जात आहे. त्यात 3000 हजार 4000 चा भाव सांगितला जात असला तरीही दिवसांतून एखाद्याला हा भाव मिळतो. कांद्याचा पहिल्या पासून हिशोब पाहिल्यास एका पोत्याला सातशे रुपये खर्च येतो. त्याच पोत्याला विकल्यावर बाजारात 200 रुपये भाव मिळत असतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याची प्रतिक्रिया जन महाराष्ट्र न्यूजला शेतकऱ्यांनी दिली आहे.