पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, पुणेकरांची तारांबळ, अनेक भागात बत्तीगुल
पुणे: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सिंहगड रस्ता, टिळक रोड परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच कोथरूड परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. संध्याकाळी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली, शहरातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात वीज गायब झाली आहे. खराडी, मुंढवा, वाघोलीत पण पावसाला सुरूवात झाली आहे. IMD ने आज महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता.
आज (26 नोव्हेंबर) आणि उद्या (27 नोव्हेंबर 2023) महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळासोबत गारपीटही होऊ शकते.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे वैगई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आज नाशिक परिसरता देखील जोरदार पाऊस आला. यामुळे जिल्ह्यातील निफाडच्या द्राक्ष पंढरीत रविवारी अवकाळी पावसाने गारांसह अतिशय जोरदार फटका दिल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.