तब्बल १५ हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा मोठा फटका
पंढरपूर: पंढरपूर तालुक्यात गुरुवारी (ता. ३०) पहाटे जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील सुमारे १५ हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील सलग तीन वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पुन्हा अवकाळीचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. आज मध्यरात्रीच्या सुमारास हलका पाऊस झाला. त्यानंतर पहाटे पुन्हा जोरदार पाऊस झाला. कासेगाव (ता. पंढरपूर) मंडळामध्ये सर्वाधिक २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पावसामुळे फ्लोरिंगमध्ये आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पावसाचे पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे. त्याशिवाय भुरी, दावण्या, करपा या रोगाचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना कीटक व कीडनाशकांच्या फवारण्या कराव्या लागणार आहेत. त्याचाही आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच फवारण्याची कामे सुरू केली आहेत. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सर्वच भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग तीन वर्षापासून तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. यावर्षी नुकसान टाळण्यासाठी लवकर छाटणी केली असता पुन्हा द्राक्षाचे नुकसान झाले आहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी राज्य द्राक्ष बागायदार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केली आहे.
गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडामध्ये पाणी गेल्याने कुजवा, दावण्या, भुरी, करपा या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी एकरी १५ हजार रुपयांचा अधिकच खर्च करावा लागणार आहे. आधीच शेतकरी अडचणीत आहेत. त्यात पुन्हा अवकाळीचा फटका बसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
धनाजी नामदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कासेगाव
दुष्काळी परिस्थितीवर मात करत आम्ही द्राक्ष बागा जगवत असतानाच अवकाळीमुळे बागांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी.
संतोष खंडागळे, द्राक्ष उत्पादक, संगेवाडी, सांगोला
मंडल आजचा पाऊस एकूण पाऊस (मिमीमध्ये)
सांगोला ७.३ ३६३.७
शिवणे १०.३ ३४२.१
जवळा १४.८ ३६७.७
हातीद ७.५ ४३१.१
सोनंद ११.८ ४१६.८
महूद ६.३ २११.८
कोळा ११.३ २६३.४
नाझरा ७.८ ३९७.८
संगेवाडी १४.३ ३४१.७
एकूण १०.२ ३४८.०