आदित्य असे काही करेल…”, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या एसआयटीवर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया


मुंबई: (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली. यानंतर सरकारने याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या एसआयटी चौकशीला विरोध करण्यात आला आहे. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सरकारतर्फे जाणूनबुजून या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या निर्णयबाबत आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेतर्फे आयोजित केलेल्या एका रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिल्या असताना माध्यमांनी या प्रकरणी त्यांना प्रश्न विचारला होता.

चौकशी कुणीही लावू शकतो

आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही आरोप झाले असून राज्य सरकारने त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही एकाच कुटुंबातील आहात, त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, आदित्य असे काही करेल, असे मला वाटत नाही. चौकशा कुणीही कुणाच्या लावू शकतो. आम्ही पण याच्यातून खूप गेलो आहोत.”

तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करा

रोजगार मेळाव्यासंबंधी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आपल्या देशातील लोकसंख्येपैकी जवळपास ६० टक्के तरुण आहे. त्यांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत, ज्या तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा योजना पोहोचवण्याचे काम आमचे मनसे पदाधिकारी करत आहेत. त्या कामाला प्रोत्साहन देण्याा आमचा प्रयत्न आहे. उद्योग छोटा असो किंवा मोठा पण तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे आहे.”

Advertisement

लोकसंख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे

आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी मोठी आहे की, सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहे. त्यामुळे सरकार अपयशी होत आहे, असे मला वाटत नाही, असेही ठाकरे म्हणाल्या. संसदेत काही तरुणांनी घुसखोरी करून बेरोजगारीसंबंधी घोषणा दिल्या, याबद्दल प्रश्न विचारला असताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, राज ठाकरेंनी १९९३ साली नागपूर विधानभवनावर बेरोजगारीच्या विषयावर एक मोठा मोर्चा काढला होता. हा प्रश्न काही आजचा नाही. ३० वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनीही या प्रश्नांवर हजारो तरुणांना एकत्र करून लढा दिला होता. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी काही उपाययोजना हाती घेतल्या पाहीजेत. कारण १४० कोटी लोकांना रोजगार देणे, ही अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण करण्याचे प्रयत्न झाले पाहीजेत. मग सरकारच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

उद्धव ठाकरेंनीही एसआयटीवर केली टीका

एसआयटी स्थापनेनंतर नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “ज्यांच्यापासून भीती असते, त्यांच्यावर आरोप केले जातात. पण, आम्हालाही एसआयटी चौकशा लावता येतील. त्यामुळे त्यांनी (सरकारने) त्याच्यात जाऊ नये. अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू.”

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही एसआयटीच्या स्थापनेचा विरोध केला. “दिशा सालियान यांच्या मृत्यूप्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करायची असेल तर जरूर करा. पण न्यायमूर्ती लोया आणि अनिक्षा जयसिंगानी, अमृता फडणवीस याप्रकरणातही एसआयटी गठीत करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) पोस्ट लिहून ही मागणी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »