उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करणारं महाराष्ट्र जगातील पहिलं राज्य, बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर


पुणे : (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) अंतरावली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावरून सरकार अडचणीत आलेलं असतानाच आता सत्ताधारी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करणारं महाराष्ट्र जगातील पहिलं राज्य असल्याचा ‘कडू’ टोला त्यांनी सरकारला लगावला.

उपोषणावर लाठीचार्ज झालेला तुम्ही कधी पाहिला आहे का? गेल्या 75-100 वर्षातला एखादा प्रसंग सांगा. पारतंत्र्यात असताना, स्वातंत्र्याची लढाई सुरू असतानाही उपोषणावर लाठीचार्ज झाला नाही. जर तिथे लाठीचार्ज झाला नसता तर तुम्ही जरांगे-पाटलांचे नाव घेऊन आले असते का? देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका बदलायला नको होती. उपोषण आणखी 2 दिवस चालले असते तर वाईट करत काही झाले नसते. पण उपोषणस्थळी लाठीचार्ज करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.

भुजबळांवर निशाणा

Advertisement

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभांवर सभा घेणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावरही बच्चू कडू यांनी निशाणा साधला. हे सगळे पक्ष संघटना वाढवण्याच्या हिशोबाने मैदानात उतरले आहेत. जरांगे नेते असते तर त्यांनाही बोललो असतो, पण ते तर कार्यकर्ते आहेत. पाणी पडल्यावर बियाणे पेरतो तशी ही राजकीय बियाणे पेरण्याची वेळ आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ असे सरकार म्हणतंय. मग सभा का घेतल्या जात आहेत? असा सवाल करत बच्चू कडू यांनी भुजबळांवर निशाणा साधला. ही राजकीय पेरणीची वेळ असून ती होतही आहे. पण यातून समाजासमाजात तेढ निर्माण होईल याची काळजी सर्व नेत्यांनी घ्यावी, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले.

मी मराठा ही जात मानत नाही

बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी मराठा ही जात मानत नाही. मराठा हा जर जातीवाचक वाटत असेल तुम्हाला राष्ट्रगीतातून हा शब्द काढावा लागेल. मराठा हे मुलखाचे नाव आहे, हे शासनाने समजून घ्यावे. जास्तीत जास्त हा 8 जिल्ह्यांचा प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्राचा नाही, असे म्हणत बच्चू कडू आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे म्हटले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »