दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान, पैसे थेट बँक खात्यात जमा होणार का दूध संघाला मिळणार ?


पुणे :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) गेल्या काही वर्षांपासून दुधाचा धंदा हा मोठा आव्हानात्मक बनला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याच्या वाढत असलेल्या किमती, इंधनाची वाढलेले दर वाढलेली महागाई या सर्व पार्श्वभूमीवर या व्यवसायात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुधाला अधिक दर दिला गेला पाहिजे अशी मागणी केली जात होती. तसेच अनेक शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची महत्त्वाची घोषणा केली. मात्र, हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीये. हे अनुदान संबंधित दूध उत्पादक संघ किंवा दूध डेरीचा खात्यावर जमा होणार आहे.

Advertisement

यामुळे मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा देखील केला. दरम्यान लोकप्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

खरे तर बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची यासंदर्भात भेट घेतली होती. या भेटीत गायकवाड यांनी पाटील यांच्याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले गेले पाहिजे अशी मागणी केली.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीत ही मागणी तत्वतः मान्य केली. विशेष म्हणजे याबाबतचा शासन निर्णय अर्थातच जीआर येत्या काही दिवसांमध्ये निर्गमित होईल असे आश्वासन देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

अर्थातच आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रतिलिटर पाच रुपयाचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या या आश्वासनानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »