राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात जागतिक एड्स दिन व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


खेड(ता. कर्जत) : (जनमहाराष्ट्र न्युज नेटवर्क) आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तसेच जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थी व समाजात जनजागृती घडून यावी म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्जत जिल्हा अहमदनगर यांच्या एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राच्या रेड रिबन क्लबच्या वतीने आयोजित रांगोळी तसेच निबंध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण सप्तर्षी व उपजिल्हा रुग्णालय कर्जतचे आयसीटीसी समुपदेशक श्री. राहुल पावडे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. डॉ. प्रविण सप्तर्षी सरांनी एड्स म्हणजे नेमके काय? तो कशामुळे होतो? त्यापासून बचाव करण्याचे, एड्स टाळण्याचे उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन करून सुरक्षित रहा, सतर्क रहा व एड्स टाळा, यावर आपले विचार मांडले. तर आयसीटीसी चे समुपदेशक माननीय राहुल पावडे यांनी एचआयव्ही होण्याची प्रमुख चार कारणे, एचआयव्ही होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? गरोदर मातांची तपासणी बाळाच्या आरोग्यासाठीची काळजी व विशेष करून ट्रक ड्रायव्हर वगैरे लोकांनी दर सहा महिन्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. यासाठी रेड रिबन क्लब, आयसीटीसी विभाग व उपजिल्हा रुग्णालयातर्फे एचआयव्ही मोफत तपासणी शिबिरही घेण्यात येतात, त्यात सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी व एड्स टाळून आपले व आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे नवनियुक्त विश्वस्त श्री. आप्पा अनारसे उपस्थित होते. विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धांचे आयोजन व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. संदीप काळे, सौ. शितल भोसले मॅडम, कार्यालय प्रमुख श्री. भगवान काळे, क्रीडा संचालक डॉक्टर अनिल गदादे, प्रा. नवनाथ धावडे, श्री रमेश जंजिरे यांचाही सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब विभाग तसेच एकात्मिक चाचणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या वतीने आयोजित वकृत्व स्पर्धेत हर्षदा सोनवणे प्रथम क्रमांक व तनुजा मोरे द्वितीय क्रमांक, पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रद्धा शिंदे द्वितीय क्रमांक तनुजा मोरे तर तृतीय क्रमांक हर्षदा सोनवणे यांनी प्राप्त केले. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षदा सोनवणे द्वितीय क्रमांक तनुजा मोरे तृतीय क्रमांक प्रतीक्षा मोरे यांना तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिक्षा मोरे द्वितीय क्रमांक तनुजा मोरे व तृतीय क्रमांक वर्षा डूचे यांनी प्राप्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलिपसिंह निकुंभ यांनी अध्यक्षीय समारोपात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रा. आतिश नाईकवाडे, प्रा. शाहूराव पवार, श्री. अंकुश शेटे, विठ्ठल यादव, आबासाहेब भिसे, ज्ञानेश्वर जंजिरे, अमोल जावळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »