सोलापुरात कांद्याची आवक घटली
सोलापूर:(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९२ गाड्या कांद्याची आवक झाली होती. मागील दोन महिन्यातील ही सर्वात कमी आवक आहे. तरीदेखील कांद्याचे दर गडगडलेलेच असल्याची स्थिती बाजारात पाहायला मिळाली.
सरासरी दर सोळाशे रुपये तर सर्वाधिक दर अवघ्या चार क्विंटलला तीन हजार ४०० रुपये मिळाला. डिसेंबरच्या सुरवातीला सोलापूर बाजार समितीत एकाच दिवशी तब्बल साडेतेराशे ते चौदाशे गाड्या कांदा आवक झाला होता. बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार न करता एक दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णय घेतला. पण, माध्यमांसह शेतकऱ्यांनी अशा प्रकाराला कडाडून विरोध केल्यानंतर सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यावर तोडगा काढला. सध्या बाजार समितीत कांद्याचे दररोज लिलाव होत आहेत. पण, मागील काही दिवसांत आवक- कमी जास्त होत असून सोमवारी मागील दीड-दोन महिन्यातील सर्वात निच्चांकी आवक सोलापूर बाजार समितीत झाल्याची नोंद झाली. कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आवक वाढली किंवा कमी झाली तरीदेखील भाव गडगडलेलेच असल्याची वस्तुस्थिती आहे. समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू कायम आहेत. शेतकऱ्यांची दुरवस्था पाहून केंद्र सरकार निर्यातबंदी उठविणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.