राज्यात वर्षअखेर पावसाची हजेरी, नवीन वर्षातही वरुणराजा बरसणार; हवामानात चढ-उतार कायम
कुर्डुवाडी :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) डिसेंबर महिना संपून नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे देशासह राज्यातील तापमानातही मोठी घट होताना दिसत आहे, दुसरीकडे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
वर्षअखेर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यासोबतच नवीन वर्षातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाची शक्यता
वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाबमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पूरग्रस्त तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमधील पूर ओसरला असताना पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे नागरिक चिंतेत आहे. महाराष्ट्रासह गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या ठिकाणी वर्षअखेर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता आहे.
हवामानात चढ-उतार कायम
राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. पुणे, सोलापूर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सकाळी आणि रात्री तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे, तर दुपारच्या वेळी तापमानात किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे.