पुण्यात येरवडा जेलमध्ये कैद्याची हत्या: कात्री अन् दरवाजाच्या बिजागिरीने भोसकलं
पुणे :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) पुण्यातील गुन्हेगारीचं सत्र थांबायचं नाव घेतना दिसत नाही. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे.
कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येरवडा कारागृहात काल संध्याकाळी चार वाजता कैद्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने येरवडा कारागृह हादरलं आहे. महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून 4 कैद्यांनी महेशची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैचीने आणि दरवाज्याच्या बिजागिरीने मानेवर वार करत कैद्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
महिला पोलिसांसमोर कोयत्याने हल्ला
पुणे जिल्ह्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच दोन गटांमध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची घटना वडगावशेरी या परिसरात घडली. या कोयता हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला असून पुण्यात खरचं कायदा व्यवस्था उरली आहे का असा सवाल विचारला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. कोयता हल्ला होत असताना महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र, पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरूणावर कोयत्याने वार केले. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे.