पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन
हडपसर:(जनमहाराष्ट्र न्युज नेटवर्क) सासवड (ता.पुरंदर) येथील वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार (ता.१२ जानेवारी) रोजी करण्यात आले आहे. येथे दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील ३६५० विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्स्टाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा क्रिडाधिकारी महादेव कसगावडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र.कुलगुरू पराग काळकर,ठाणे जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक, सासवड महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय धुमाळ, के.जे.इन्स्टिट्युटचे के.जे.जाधव, त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत. मागील नऊ वर्षापासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ९७२ विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे मानध सचिव ॲड.संदीप कदम यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी वाघोली,खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सूपे, नसरापूर, न्हावरे येथील संस्थेच्या विद्यालयांचे मिळून असे नऊ गट तयार करण्यात आले. नऊ गटांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, या सांघिक तर कुस्ती, बुद्धिबळ,कराटे,तायक्वांदो योगासने, अॅथलेटिक्स या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे १५००० खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी जिल्हापातळीसाठी खेळणार आहेत. त्यातील बुद्धिबळ, कुस्ती, कराटे, तायक्वांदो,कराटे, योगासने या जिल्हापातळीवरील स्पर्धा ८ जानेवारीला पार पडल्या. तर उर्वरीत स्पर्धा १३ आणि १४ जानेवारीला होणार आहेत. गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धांमुळे आजअखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर ६२, राष्ट्रीय पातळीवर ३२८, राज्य पातळीवर ५८२, अशा एकूण ९७२ खेळाडूंची निवड झाली. त्यापैकी आंतरराष्ट्रीय पातळीवर ४७, राष्ट्रीय पातळीवर १९८, राज्य पातळीवर ३९८ अशी एकूण ६४३ पदके विविध खेळाडूंना प्राप्त झाली आहेत. श्रीलंका, मास्को, सिंगापूर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, बॅंकॉक, थायलंड, भूतान या देशात झालेल्या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव, प्राचार्य डॉ.मनोहर चासकर, डॉ.पंडीत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.