सोलापूरात रे नगर पाच लाभार्थ्यांना मिळणार पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी
सोलापूर :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे लोकार्पण होणार आहे. साधारणतः दीड तासांच्या दौऱ्यात पाच लाभार्थींना स्टेजवर बोलावून पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी दिली जाणार आहे.
ते लाभार्थी कोण? हे कार्यक्रमाप्रसंगी ऐनवेळी जाहीर होईल. तर स्टेज जवळील एका इमारतीसमोरील फीत कापून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.रे नगरातील पाच घरकूल लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात चावी वाटप आणि लोकार्पण सोहळा हा साधारणतः १५ मिनिटांचा असणार आहे. तत्पूर्वी, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांचे पाच मिनिटांचे प्रास्ताविक होईल. स्वागत, सत्कार होऊन प्रकल्पाची काही मिनिटांची चित्रफीत दाखविली जाईल. त्यानंतर राज्यातील व केंद्रातील काही प्रमुख मंत्र्यांची भाषणे होतील. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंदाजे १५ ते २० मिनिटांचे भाषण करतील. समोरील लोक व स्टेज, यामध्ये मोठे अंतर असेल.
दरम्यान, प्रधानमंत्री कार्यालयातील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) सुरक्षिततेच्या अनुषंगाने संपूर्ण पाहणी केली असून त्यांचे जवळपास १०० अधिकारी व कर्मचारी रे नगरात दाखल झाले आहेत. पंतप्रधानांचा दौरा नेमका कसा असेल याबाबत गुप्तता पाळली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार नरसय्या आडम, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ‘म्हाडा’चे सीईओ अशोक पाटील, मुख्य अभियंता शिवकुमार आढे, मिलिंद आटकळे यांनी रे नगरातील तयारीची पाहणी केली.