“रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंदिरात…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना भावूक
अयोध्या :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित साधू, संतांशी, निमंत्रितांशी आणि देशाशी संवाद साधला. त्यांनी आजच्या सोहळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ते काहीसे भावूकही झाले होते.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“सियावर रामचंद्र की जय… सियावर रामचंद्र की जय! सर्वांना प्रणाम आणि सर्वांना राम राम… आज आपले राम आले आहेत. शतकाच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकाच्या अभूतपूर्व धैर्य अगणित बलिदान त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगाची आपल्या सर्वांना, संपूर्ण देशाला शुभकामना. अभिनंदन. “
मी जी अनुभूती घेतली ती शब्दांमध्ये सांगता येणार नाही
“मी आत्ताच अयोध्येतील मंदिराच्या गाभाऱ्यातून ईश्वरच्या चेतनेचा साक्षीदार होऊन तुमच्यासमोर उभा राहिलो आहे. आजचा जो क्षण आहे त्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण कंठ दाटून येतोय. माझं शरीर अजूनही स्पंदीत आहे. मन अजूनही त्या क्षणांमध्ये लीन आहे. आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आपले रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहतील. माझा पूर्ण विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, मी जो अनुभव घेतला त्याची अनुभूती देशातील विश्वाच्या कोपऱ्यातील रामभक्तांना होत असेल. हा क्षण अलौकीक आहे. आजचा क्षण पवित्र आहे. अयोध्येतला माहोल, वातावरण हे सारंकाही प्रभू रामाचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४चा हा सूर्य अद्भूत आभा घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवरील तारीख नाही. ही एका नव्या कालचक्राची सुरुवात आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनानंतर प्रत्येक दिवस संपूर्ण देशात उमंग आणि उत्साह वाढत जात होता. आज त्या उत्साहाचं रुप मी समोरही पाहू शकतो आहे.”
आता नवराष्ट्र निर्मिती होणार
“आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत. आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांन ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.