अध्यादेश दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम
खारघर नवी मुंबई :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या चर्चा सुरू होत्या.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारने अध्यादेश द्या, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
“छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मनोज जरांगे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. सकाळी शासनासोबत चर्चा झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुंबईमध्ये आलो. सरकारने त्यांची भूमिका आणि आपलीही भूमिका ऐकली. ५४ लाख ओबीसी नोंदी सापडल्या असतील तर त्याचे वाटप करा, अशी आपली मागणी होती. ज्या ५४ लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात, त्यांचे वाटप होईल,” असे जरांगे पाटील म्हणालेत.
काय आहेत मागण्या?
तसेच “ओबीसी दाखल्याची एक नोंद जरी सापडली तरी 50-50 जणांना त्याचा लाभ मिळतोय. यामुळे 2 कोटी मराठे लाभार्थी ठरत आहेत. प्रमाणपत्रासाठी आपल्याला अर्ज करणे गरजेचे आहे. गावागावात ज्यांची नोंद मिळाली आहे, त्यांनी अर्ज करण्यास सुरूवात करा,” असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
३७ लाख प्रमाणपत्र वाटप…
“54 लाख प्रमाणपत्रांपैकी 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले असल्याची माहिती सरकारने दिली आहे. त्याची माहिती मागवली आहे. ३७ लाख म्हणजे कोणाला दिले, त्याची नावासहित माहिती द्या, अशी मागणी केली आहे. अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायची मागणी केली होती, ते मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत, असे सरकारने म्हटले आहे, मात्र त्याचे पत्र दिले नाही,” अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे.
सरकारला पुन्हा अल्टिमेटम…
सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी 11 पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अध्यादेश नाही काढला तर उपोषणासाठी आझाद मैदानावर जाणार, पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. तसेच आजचा मुक्काम वाशीमध्येच असेल, मात्र उद्या अध्यादेश न आल्यास आझाद मैदानावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.