पंढरपूरच्या विठोबाला ८२ तोळे सोन्याची घोंगडी अर्पण, मराठवाड्यातल्या भक्ताचं दान


पंढरपूर :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाला ८२ तोळ्यांची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातल्या भक्ताने ही घोंगडी विठोबाला दान केली आहे. या घोंगडीची बाजार भावानुसार तब्बल ५१ लाख ९८ हजार इतकी किंमत आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला लोकरीच्या घोंगडीत दिसणारा विठोबा आता भाविकांना सोन्याची घोंगडीही पाहता येणार आहे. या भाविकांने यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे दान विठोबास नाव न देण्याच्या अटीवर दिलं आहे.

Advertisement

मंदिर प्रशासनाने काय म्हटलं आहे?
विठ्ठलाला यापूर्वी सोन्याची घोंगडी दान केलेली नाही. पांडुरंगाला घोंगडी पांघरलेली असते. ही माहिती त्या भाविकाला कुणीतरी दिली असेल त्या भाविकाने हे ठरवल्याप्रमाणे आज २६ जानेवारीच्या निमित्त ८२ तोळे वजनाची ही घोंगडी आहे. दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी लोकरीची घोंगडी विठोबाच्या मूर्तीला परिधान करण्यात येते. त्याऐवजी आता ही घोंगडी आम्ही वापरु. तसंच सोन्याचा दागिना असल्याने तो अधे-मधे काही विशिष्ट दिवस पाहूनही घालू शकतो. त्या भाविकाने अगदी मनापासून विठोबाला सोन्याच्या घोंगडीचं दान केलं आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हे दान भाविकाने दिलं आहे. त्या भाविकाचा हा मोठेपणा आहे असं आम्हाला वाटतं. मागच्या वर्षीही त्यांनी जसं दान दिलं होतं तसंच यावर्षीही दिलं आहे असं मंदिर प्रशासनाने सांगितलं. बालाजी पुदलवाड हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

आज तिरंगी फुलांच्या सजावटीत सजलं मंदिर

पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर आज २६ जानेवारीनिमित्त तिरंगी फुलांमध्ये सजवण्यात आलं आहे. तसंच मंदिरात फुगेही त्याच रंगांचे लावण्यात आले आहेत. आज भारताचा गणतंत्र दिवस आहे. त्या औचित्याने मंदिर सजवण्यात आलं आहे. याच दिवशी एका भाविकाने विठ्ठला चरणी सोन्याची घोंगडी अर्पण केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »