अर्थसंकल्पात सोलापूर-धाराशिव रेल्वेसाठी २२५ कोटी


कुर्डुवाडी :(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोलापूर ते धाराशिव या ८४.४४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गासाठी २२५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक तरतुदीसह युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आजच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला ८०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यातील १ हजार १७१ कोटी रुपयांची तरतूद मध्य रेल्वेला झाली आहे. त्यातील ८०० कोटी रुपये मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला मिळाले आहेत. सोलापूर विभागांतर्गत येणाऱ्या नगर-बीड-परळी या २५० किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.

सोलापूर विभागात येणाऱ्या दौंड ते मनमाड या २४७ किलोमीटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे. सोलापूर शेजारी असलेल्या पुणे-मिरज-लोणंद या ४६७ किलोमीटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी २०० कोटींची तरतूद केली आहे.

Advertisement

या कामामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा तालुक्यातील नागरिकांना लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्याची कोल्हापूर जिल्ह्याशी रेल्वेद्वारे दळणवळणाची सुविधा अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.

पर्यटनातून निधीची अपेक्षा

आजच्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी राज्य सरकारला बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा आध्यात्मिक पर्यटनातील प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो.

पंढरपूर, अक्कलकोट व शेजारच्या जिल्ह्यात असलेल्या तुळजापूर-गाणगापूर या तीर्थक्षेत्रामुळे केंद्राच्या पर्यटन योजनेतून सोलापूरला सोयी-सुविधांसाठी निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

सोलापूर विभागासाठीच्या तरतुदीमुळे पायाभूत सुविधा वाढण्यास मदत होईल. यामुळे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचीही संख्या वाढेल. त्यामुळे या भागातील प्रवाशांना दळण-वळणाची चांगली सुविधा उपलब्ध होईल.

– नीरजकुमार दोहरे, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »