राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार अभयसिंह जगताप यांचा भुताष्टे गावातील नागरिकांशी संवाद
भूताष्टे -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे संभाव्य उमेदवार अभयसिंह जगताप यांनी गुरुवारी सायंकाळी भूताष्टे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजाभाऊ नवनाथ यादव यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन भुताष्टे आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भुताष्टे गावचे सरपंच सुरेशशेठ यादव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढयाचे युवा नेते अभिजित साठे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी संधी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मी स्वतः उच्चशिक्षित असून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्पर असलेला शरद पवार साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. घरातूनच राजकीय वारसा असल्याने जनतेची सेवा करण्याची आवड असल्याने समाजसेवेत रस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना जगताप पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके असणारे पक्ष आता मोजता येईनात एवढे झाले आहेत याला मोदी सरकार कारणीभूत असून फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राची वाट लागली असल्याने महाराष्ट्राचा विकास खुंटला असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रातील मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही, गेल्या दहा वर्षात कृषी क्षेत्राला न्याय मिळाला नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होत नाही तसेच शेती मालाला भाव मिळत नाही हे सरकार अंबानी आणि आदानी यांचे असून खाजगीकरण रोखायचे असेल तर काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे नागरिकांशी संवाद साधत असताना माढा लोकसभा मतदार संघातील शिक्षण, आरोग्य, कृषी, आणि उद्योग क्षेत्राची सध्याची स्थिती जाणून घेतली तसेच येणाऱ्या काळात हे विषय जातीने लक्ष घालून मार्गी लाऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भूताष्टे गावातील पोपट यादव, गोविंद यादव, अतुल यादव, अक्षय यादव, संभाजी यादव, हर्ष विठ्ठल यादव, रमेश जाधव यांच्यासह नागरिक आणि युवक तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.