मॉरिसकडे पिस्तूल कसं आल? गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्राबाबत खळबळजनक माहिती समोर!
मुंबई -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) मुंबईच्या दहीसरमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान मॉरिस नरोना याने गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलं आहे, त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉरिस भाईने गोळीबारात जे शस्त्र वापरलं आहे, ते अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मॉरिसला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे मॉरिसने ज्या पिस्तुलामधून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या ते पिस्तूल अवैध असल्याचं बोललं जात आहे. मॉरिसकडे हे शस्त्र कुठून आलं, त्याला ते कसं मिळालं याचा आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.
दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वा त्यांचं निवासस्थान बोरिवली पूर्व येथून सुरू होणार आहे. त्यांच्यावर दौलत नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर मॉरीसचे कुटुंब परदेशात आहे, त्यामुळे त्याचा मृतदेह दोन दिवसानंतर कुटुंबाला दिला जाणार आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. ज्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तो मॉरिस भाई स्वतःला समाजसेवक म्हणतो. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी अनेक वाद होते मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी मॉरिस भाईच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह आले होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे.