महायुतीत कोणाला किती जागा मिळणार? ५ मार्चला होणार फैसला


पुणे -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) भाजपने उमेदवारांची पहिली यादी घोषित केली असली, तरी महाराष्ट्रातील नव्या मित्रांशी होणारी जागावाटप चर्चा ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान होणार आहे.

भाजपने किमान ३३ जागा लढाव्यात, अशी सर्वेक्षण संस्थांची सूचना आहे. भावना गवळी (यवतमाळ) आणि धैर्यशील माने (इचलकरंजी) या दोघांना संधी देणे अशक्य असल्याचे लक्षात आले, असे शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. आग्रह धरणे नुकसान करणारे असल्याचेही या गटाच्या लक्षात आले आहे.

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस अकोला, संभाजीनगर आणि जळगाव या तीन ठिकाणच्या सभांदरम्यान शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करतील, असे समजते.

Advertisement

शिंदे गट जागा कमी करण्याच्या कोणत्याही हालचालीला विरोध करण्याची भाषा करत असला, तरी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोध करण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे समजते. खासदारांची कामगिरी समाधानकारक नसली, तरी मुख्यमंत्री शिंदे यांची लोकप्रियता वाढते आहे, असे भाजप नेते मान्य करतात. काही अपवाद वगळता शिंदे गटातील खासदार निवडून येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, असे पाहणी तसेच ‘नमो app’ वर मिळालेल्या फीडबॅकनुसार सांगितले जात आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागण्या कमी असून ते वेळप्रसंगी अगदी सहा-चार जागांवरही समाधान मानून घेतील, असा अंदाज आहे.

५ मार्चच्या अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर ६ मार्चला लगेचच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आहे. महाराष्ट्रात सामना रोमहर्षक असल्याने येथील जागांची घोषणा उशिरानेही होऊ शकेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »