आजपासून दीड महिन्यासाठी विठ्ठलाचे गाभारा दर्शन बंद, केवळ ‘या’ वेळेतच मुखदर्शन घेता येणार
पंढरपूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढच्या दीड महिन्यांसाठी विठ्ठलाचे पायावरचे दर्शन म्हणजे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही. दिवसभरात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असे केवळ पाच तास मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मंदिर विकास आराखड्यातील विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील कामाला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार असून आजपासून देवाचे पायावरचं दर्शन दीड महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना आता दुरून, सकाळी 6 ते 11 असे केवळ केवळ पाच तास मुखदर्शन मिळणार आहे.
इनकॅमेरा कामाची सुरूवात होणार
आज पासून पहिले दोन दिवस सोळाखांबी, चौखांबी आणि गाभाऱ्यात लावण्यात आलेली चांदी काढण्याचे काम सुरु होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या अध्यक्षतेखाली 25 जणांची समिती नेमली असून आजपासून इनकॅमेरा मंदिरातील चांदी काढण्यास सुरुवात होणार आहे.
यानंतर 17 मार्च पासून थेट विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात लावलेले मार्बल आणि ग्रॅनाईट फारशा हटवण्यास सुरुवात केली जाणार आहे. गाभाऱ्यातील फारशा हटवण्याचे काम सुरु करण्यापूर्वी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती अनब्रेकेबल काच पेटी बसवली जाणार आहे. केवळ नित्योपचाराच्या वेळी हि पेटी काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता दर्शन घेताना भाविकांना बंद काचपेटीत असणाऱ्या मूर्तीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
भाविकांना 30 फुटांवरून मिळणार दर्शन
पुढच्या दोन दिवसांपासून म्हणजे, 17 मार्चपासून गाभाऱ्यात लावलेली ग्रॅनाईट, मार्बल फारशा काढून मूळ दगडी भिंती उघड्या केल्या जातील. यानंतर गाभाऱ्यातील मूळ काळ्या पाषाणावर आलेले सिमेंटचे थर काढण्यासाठी वाळूच्या प्रेशरने मारा करून मूळ दगडी रूप दिले जाणार आहे.
मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्या बाबत माध्यमांनी वारंवार आवाज उठवल्यावर नवीन आराखड्यात या कामाचा समावेश झाला होता. आषाढी एकादशीपूर्वी या आराखड्यातील बहुतांश कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आता दीड महिना देवाच्या पायवरील दर्शन पूर्ण बंद केले जाणार आहे. त्यामुळे आता भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे.