जानकर फिरले माघारी; माढ्यात कोण वाजवणार तुतारी ?


माढा -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) माढ्याचा तिढा आता महाविकास आघाडीकडे सरकू लागला असून, रासपचे महादेव जानकर यांनी अचानक महायुतीशी घरोबा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आणले असताना अचानक ही राजकीय घडामोड घडली आहे. यामुळे आता या मतदारसंघात कोण तुतारी हाती घेणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना घाम फोडणे सुरू केले आहे. शरद पवार यांनी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना हाताशी धरले होते. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ उमेदवारांची यादी बाहेर पडली होती. यात महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश होता. तोच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांच्याशी संधान साधून, त्यांना लोकसभेच्या दोन जागाही देऊ केल्या आहेत.

परभणीच्या जागेवर त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दुसरीकडे मोहिते पाटील आणि रामराजे निंबळकरांचा महायुतीच्या उमेदवारास असणारा विरोध ओसरू लागला आहे. यामुळे राष्ट्रवादी पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

Advertisement

बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी फायदेशीर ठरणाऱ्या जानकर यांनी महायुतीत उडी मारल्याने, शरद पवार राष्ट्रवादी गटात नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे अभयसिंह जगताप यांनी पंढरीत येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बाहेरील कोणत्याही नेत्याला उमेदवारी न देता
राष्ट्रवादीतील नेत्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. यामुळे पुन्हा अभयसिंह जगताप हेच राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील काय? याबाबत शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. २८ मार्च रोजी म्हसवड येथे राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात येणार आहे, या मेळाव्यात उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपूर्वीच

शरद पवार राष्ट्रवादीकडून अभयसिंह जगताप यांचे नाव माढा लोकसभेसाठी पुढे आले होते. यानंतर त्यांनी या मतदारसंघाचा दौराही पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत नागरिकांमध्ये सहानुभूतीची लाट आहे. यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होणार असल्याचे संकेत अभयसिंह जगताप यांनी दिले.

जानकर गमावल्यानंतर आता जगताप पुढे

शरद पवार राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी अभयसिंह जगताप यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. महादेव जानकर यांनी अचानक महायुतीबरोबर संधान बांधले ,आणि राष्ट्रवादी
पुढच्या चाली खेळू लागली. २८ मार्च रोजी म्हसवडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कदाचित या मेळाव्यातच राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते. याबाबत, अभयसिंह जगताप यांनी पंढरपूरमध्ये सुतोवाच केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »