सांगलीत द्राक्ष मळ्याच्या कंपनीमध्ये तब्बल 245 कोटी रुपयांचे एमडी जप्तः मुंबई पोलिसांनी सांगलीमध्ये जाऊन केली कारवाई, सहा जण अटकेत


सांगली -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सांगली जिल्ह्यात द्राक्षांच्या मळ्यात असलेल्या मेफेड्रोन उत्पादन कारखान्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करून तब्बल २४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या वेळी मेफेड्रोन उत्पादन करणाऱ्या प्रवीण शिंदेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत ७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यात काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान सांगलीतून एमडी आणल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सांगलीत धाड मारून कारखाना उद्ध्वस्त केला.

Advertisement

 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सांगली जिल्ह्यातील इरळी गावातील एका शेतावर छापा टाकून १२२.५ किलो मेफेड्रोनसह कृत्रिम उत्तेजक द्रव्य जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण २५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. यातील मुख्य आरोपी शिंदे हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रहिवासी असून त्याने इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, अमली पदार्थ बनवण्यात तो एक्स्पर्ट असल्याचे सांगण्यात आले. शिंदे याने त्याच्या सहकाऱ्यांसह इरळी गावात प्रयोगशाळा स्थापन करण्यापूर्वी मेफेड्रोन उत्पादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तर प्रदेशला भेट दिली होती. सोमवारी अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी पाच सांगलीतील शेतकरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

आरोपींकडून द्राक्षांची बाग असलेली १२ एकर जमीन खरेदी

आरोपींनी गावात द्राक्षांच्या मळ्यांनी वेढलेली १२ एकर जमीन खरेदी केली होती. येथे त्यांनी अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सुरू केला. शिंदे याने तयार केलेले रसायन १ लाख रुपयांनी विक्री करण्यात येत होते. कारखान्यात जप्त करण्यात आलेला मेफेड्रोन हा क्रिस्टल स्वरूपात होता, त्याला लॅव्हिश असेही म्हणतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »