प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्याः पुलवामा हल्ला प्रकरणातील वक्तव्यावरुन गुन्हा दाखल करण्याची मागणी; BJP ची आयोगात तक्रार
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. पुलवामा हल्ला प्रकरणी प्रणिती शिंदे यांनी केलेले विधान हे देशद्रोही असून सैन्याचे मनोधैर्य खचवणारे असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
2019 मधील निवडणुकीत काश्मीर मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. वास्तविक विरोधक आज देखील या हल्ल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशीच टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर केली होती. आता या प्रकरणी प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तसे पत्र भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला देखील पाठवले आहे.
नेमके काय म्हणाले भारतीय जनता पक्षाच्या पत्रात ते देखील पहा…
सोलापूर मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार प्राणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात देशद्रोही वक्त्यवं केले आहे. सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी राजकीय फायद्यासाठी या दुःखद घटनेचा गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. श्रीमती प्रणिती शिंदे यांनी विधान केले की “पुलवामा हल्ला हे केंद्र शासन व मा. पंतप्रधान मोदीजींनी आपल्या जवानांचे रक्त सांडून ‘घडले’ नसून ‘घडवले
काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता.” है वक्त्यवं देशाची बदनामी करणारे ‘देशद्रोही वक्त्यवं आहे. जे निवडणूक नियमांची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचे मनोधैर्य खचवणारी आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, जेव्हा पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी पुलवामा, काश्मीरमध्ये भीषण हल्ला केला, तेव्हा हे खेदजनक आहे की दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याऐवजी, सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या राजकीय अजेंडांसाठी एक साधन म्हणून त्याचा वापर करणे निवडले आहे. आणि त्याचा राजकीय हेतूने उपयोग करून घेत आहेत. हा शहीद जवानांचा अपमान आहे. अशी विधाने केवळ आपल्या सशस्त्र दलांच्या प्रयत्नांनाच कमी करत नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्द्द्याचे राजकारण करतात. राष्ट्रीय मुद्द्द्याचे राजकारण जी राष्ट्रीय बदनामी करणारी आहे. वरील बाबीच्या विचारात घेऊन उपरोक्त विधान करणाऱ्या सोलापूर काँग्रेस उमेदवार श्रीमती प्राणिती शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता तसेच निवडणूक आयोग नियमावली नुसार गुन्हा दाखल करावा ही विनंती. आपली लोकशाही निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांवर भरभराटीला येते आणि आपल्या निवडणूक प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी अशा वक्तव्यावर योग्य ती कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे.