महायुती सोडू नये म्हणून मला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्याः .. तर धनगर समाज तुरुंगाला वेढा देईल, उत्तम जानकरांचा महायुतीला इशारा
अकलूज -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) महायुतीत थांबलो नाही तर जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी भाजपवर केला आहे. तसेच, मला अटक केल्यास दोन कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा देतील, असा इशाराही जानकर यांनी भाजप सरकारला दिला आहे.
उत्तम जानकर पुढे म्हणाले, 1990 पासून म्हणजे गेली 30-35 वर्षे भाजपमध्ये काम केले. 2014 ला सरकार आले आणि आमच्या अपेक्षा उंचावल्या. त्यावेळी माझा पाच हजार मतांनी पराभव झाला होता. दिल्लीत आणि राज्यात सरकार होते. त्यांच्याकडे समुद्र होता, त्यामुळे माळशिरसच्या विकासासाठी तांब्याभर पाणी मागितले. पाणी तर दिलेच नाही, उलट अजिदादांच्या धरणातील पाणी प्या, असे सांगण्यात आले.
शहाजीबापूंचा 50 हजार मतांनी पराभव
उत्तम जानकर म्हणाले की, भाजपवाले मला सगळं द्यायला तयार होते, पण मी फक्त माझ्या दहा वर्षाचा हिशोब मागितला. सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत आणि सांगोलाकर वाट बघतायत तुमचा मुहूर्त लावायला. तुमच्या सांगोल्यात 50 खोके म्हणजे 50 हजारांनी पराभव करणार आहोत, असंही जानकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी जानकरांनी अजित पवारांनाही टोला लगावला होता. मला अजून पक्षातून काढून टाकलेले नाही. मी पक्षाचा संस्थापक सदस्य आहे, मीच तुम्हाला पक्षातून काढून टाकेन असे जानकर म्हणाले होते.
महायुतीला इशारा
उत्तम जानकर म्हणाले, महायुतीत थांबलो नाही, तर जेलमध्ये टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. असे राजकारण मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नव्हते. पण, मला सरकारला सांगायचे आहे. ज्या दिवशी मला अटक केली जाईन, त्यादिवशी राज्यातील दोन कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी महायुतीला दिला आहे.