सांगोला तालुक्यात 16 टँकरने 33 गावांना तर शहराला दिवसाआड पाणी
सांगोला -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सांगोला तालुक्यात टंचाईच्या झळा वाढत आहेत. तालुक्यात १६ टँकरद्वारे ३३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. सांगोला शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र उन्हाची तीव्रता आणि उपलब्ध पाणी पाहता भविष्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. उजनीतून सोडलेले पाणी इसबावी बंधाऱ्यात साठवले आहे. तेथून सांगोल्यासाठी उपसा होत आहे. वाढेगावचा तलाव भरून घेण्यात आल्याने सध्या पाणीपुरवठ्यास अडचण नसली तरी भविष्यात पाण्याची समस्या ओळखून काटकसरीने पाणी वापरावे.
शहर परिसरातील १३ वाड्या-वस त्यांवरही पाणीपुरवठा सुरू आहे. नगरपालिका हद्दीतील लोकसंख्येला पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इसबावी सुधारित पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये कार्यान्वित झालेली आहे. भीमा नदीतील बंधाऱ्यात पाणी उपसा करण्यासाठी २७० एचपीच्या दोन मोटारी, १२५ एचपीची मोटर असून, पंढरपूर सांगोला पाइपलाइन ४०० मिमी व्यासाची असून, त्याची लांबी ३४ किमीची आहे. सांगोला शहराला पिण्यासाठी इसवावी येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यातून प्रतिदिन सरासरी ५० लाख लिटर्स पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. पंढरपूर येथून मोटारीच्या माध्यमातून उचललेले पाणी सांगोला नगरपरिषद हद्दीत एकूण ११ पाण्याच्या उंच टाक्यामध्ये साठवणूक केले जाते. साठवणूक करण्यात येणारा पाणीसाठा क्षमता ३०.२५ लक्ष लिटर्स इतका आहे. सांगोला नगरपरिषद हद्दीत कार्यरत १९६ विंधन विहिरी आहेत. त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा यावर्षी उन्हाची दाहकता व कडक उन्हाळा लक्षात घेता तसेच पाण्याची गरज व मागणी विचारात घेता उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीटंचाई काळात नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे. डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी