उजनी धरण पात्रात प्रवासी बोट बुडाली; एकाचा जीव वाचला, सहाजण बेपत्ता, शोधमोहिम सुरू
टेंभुर्णी -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी तालुका इंदापूर येथे काल सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली असून यातील काहीजण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत असून या बोटीमध्ये एकूण सात प्रवाशी प्रवास करत होते. यातील एकजण सुखरूप असून बाकीच्या सहा जणांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरू केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट केलं असून शोधमोहिम सुरू असल्याचं म्हटलं आहे. उजनी धरणाच्या पात्रात वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेसंदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सुप्रिया सुळे यांचं ट्विट काय?
“उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी तालुका इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली. या घटनेत काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. परंतु येथे मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आणखी साधनसामग्रीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी पुणे यांना विनंती आहे की, आपण याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. सदर घटना अतिशय गंभीर असून येथील मदत आणि बचाव कार्याचा मी सातत्याने आढावा घेत आहे. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. बेपत्ता असणारे सर्वजण सुखरुप असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.