मान्सूनचे थैमान; पावसाला सुरुवात होताच सोलापूरात दोघांनी गमावला जीव
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) राज्यात मान्सून दाखल झाला असून जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्यातील सगळ्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मात्र, हा पाऊस आपल्यासोबत वादळी वारा आणि विजांचा कडकडाटही घेऊन येत आहे. अशातच आता सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्ये वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. यासोबतच दोन शेळ्याही दगावल्या आहेत. या घटना वेगवेगळ्या गावांमध्ये घडल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळळी गावात वीज कोसळ्याने आमसिद्ध गायकवाड (वय 67) यांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत कुंभारी गावात ‘बिळेणी डक्के’ या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्यानेच डक्के यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी राठोड यांना उपचारसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्ण्यात आलं आहे.
दरम्यान, सोलापूरमध्ये आज आणि उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 2 दिवस सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.