सव्वादोन किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला ८५.९३ लाखांचा गंडा; सोनारासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सव्वादोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

कॅनरा बँकेच्या पश्चिम पेठ शाखेसह सात रस्ता, चाटी गल्ली आणि मजरेवाडी या चार शाखांमध्ये गेल्या १ फेब्रुवारी ते २८ मे या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिलकुमार बालाजी शहापूरवाड (वय ४४) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . त्यानुसार संबंधित सोनारासह इतर तेराजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

सुनील नारायण वेदपाठक या सोनारासह जावेद वजीर शेख, हुसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक सरसंभी, जुबेर जहाँगीर मुल्ला, भुजंग सुनील शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनोद्दीन शेख, सोमनाथ मधुकर शेळके, सुरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादीर मलिक पठाण आणि उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे (सर्व रा. सोलापूर) अशी या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सुनील वेदपाठक सुवर्णकारास कॅनरा बँकेच्या चार शाखांसाठी मानधन तत्वावर सोनार म्हणून लेखी कराराद्वारे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते. सोने तारण कर्जावरील सोन्याची शुद्धता तपासणे, वजन करणे, त्याबाबत बँकेकडील पासवर्डचा फाॅर्म स्वहस्ताक्षरात प्रमाणित करून तसे प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपविण्यात आल्या होत्या. परंतु सुनील वेदपाठक याने संबंधित इतरांशी संगनमत करून बँकेच्या चारही शाखांमध्ये २२५५ ग्रॅम बनावट सोने खरे आणि शुद्ध असल्याचे प्रमाणित करून एकूण ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »