उजनी पर्यटन विकास केंद्र उभारण्याच्या पुन्हा हालचाली, पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीत आराखडा सादर


टेंभुर्णी -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर उजनी धरणाच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभारण्यासह सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनी पर्यटन विकास आराखडा सादर केला. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव दाखल केल्यास सुरुवातीला शंभर कोटींचा निधी राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उपलब्ध करून देण्याची ग्वाही पवार यांनी या बैठकीत दिली.

पुण्यात विधान भवनात झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील एकात्मिक पर्यटन विकासावर चर्चा झाली. उजनी पर्यटन केंद्र उभारणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुढाकार घेऊन चालना दिली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने उजनी धरणालगतची सहा हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडे मागितली होती. मात्र जमिनीच्या मोबदल्याचा मुद्दा प्रलंबित आहे. उजनी धरणाच्या परिसरात कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन आहे. धरणाची उभारणी होऊन ४२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. धरणाच्या मूळ आराखड्यात धरणाच्या पायथ्यास उजव्या तीरावर ४३.२६ हेक्टर जमीन पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्यासाठी आरक्षित आहे. परंतु या जागेवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे केलेल्या स्थानिकांकडून या उजनी पर्यटन केंद्राच्या उभारणीला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमणमुक्त सहा हेक्टर जमीन एमटीडीसीने यापूर्वीच मागितली आहे.

Advertisement

उजनी धरणाकडे स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन म्हणून पाहिले जाते. धरणावर दरवर्षी युरोपसह अन्य देशांतून पक्षी येतात. हिवाळ्यात रशियाजवळच्या युरेशिया, सायबेरिया, मंगोलिया आदी देशांतून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी यांसह अनेक पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होत असतात. फ्लेमिंगो पक्ष्याचे विशेष आकर्षण असते. पुढे तीन-चार महिने विविध राज्यांतील जलस्थानांवर वास्तव्य करून पुन्हा आपल्या मूळ प्रदेशांकडे हे पक्षी निघून जातात. उजनी जलाशयावर विविध २२० प्रजातींचे पक्षी येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी अभ्यासकांसह पक्षी व निसर्गप्रेमींची गर्दी होते. तसेच उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा खालावतो, तेव्हा उघड्यावर पडणारे प्राचीन पळसदेव मंदिर, कुगाव येथील आदिलशाहीकालीन ऐतिहासिक इनामदारांची गढी पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढते. त्यामुळे उजनी धरणाच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभारल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक चालना मिळू शकते.

या पार्श्वभूमीवर उजनी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या उजनी पर्यटन विकास आराखड्यामध्ये उजनी बॅकवॉटर क्षेत्रात जल क्रीडा केंद्र उभारण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. या बैठकीस करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »