आषाढीच्या पूजेबाबत मुख्यमंत्र्यांना फेरविचार विचार करावा लागेल?: छोटा गाभारा, व्हीआयपींची गर्दी, त्यात 10 पालखीप्रमुखांना निमंत्रण, 15 लाख भाविकांवर अन्याय


पंढरपूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) पंढरपुरात विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या पूजेचा मान हा मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबियांना असतो. तर एक मान हा वारीतील रांगेत लागलेल्या दाम्पत्याला मिळतो. परंतु यंदा मुख्यमंत्री शिदे यांनी 10 पालखीप्रमुखांना निमंत्रण दिले आहे. परंतु, पांडुरंगांचा गाभारा अतिशय छोटा असल्याने मुख्यमंत्र्यांची संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत येणारे व्हीआयपी लोक त्यात 10 पालखीप्रमुखांना निमंत्रण दिल्याने या ठिकाणी येणाऱ्या 15 लाख भाविकांवर अन्याय होणार नाही का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठुरायाच्या गाभारा आकाराने एवढा लहान आहे की पूजेच्यावेळी मुख्यमंत्री दाम्पत्य, मानाचे वारकरी दाम्पत्य आणि देवाचे पुजारी कसेतरी उभे राहू शकतात. त्यामुळे जरी या पालखी सोहळा प्रमुखांना सहभागी करून घेतले तरी त्यांना ही महापूजा इतर व्हीआयपी सारखे सोळखांबी मध्ये बसूनच पाहावी लागणार आहे. विठ्ठलाच्या गाभाऱ्याबाहेर एक चौखांबी असून येथे कसेतरी 10 ते 15 भाविक बसू शकतात.

उरलेल्या भाविकांना त्याच्या बाहेर असणाऱ्या सोळखांबी मध्येच बसून महापूजा पाहावी लागत असते. एकतर या पालखी सोहळा प्रमुखांना महापूजेत सहभागी म्हणजे प्रत्यक्ष पूजा करण्यास मिळणार असे वाटत आहे. त्यामुळे हे शक्य नसल्याने एकाबाजूला या पालखी सोहळा प्रमुखांची नाराजी महापूजेनंतर समोर येणार आहे.

लाखो भाविक येतात पंढरपूरात

आषाढी सोहळ्यासाठी देशभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरपूरकडे येत असतात. आषाढी सोहळ्यात पूर्वी केवळ 7 मानाच्या पालख्या म्हणून वारकरी संप्रदाय मान्यता देत आला आहे. यानंतर पालखी सोहळे राजकीय हस्तक्षेपानंतर यात वाढविण्यात आले. आजवर हे सर्व मानाचे पालखी सोहळ्यांना मंदिर समितीकडून एकादशी दिवशीचे शेकडो दर्शन पासेस देण्यात येत असतात. असे असताना यंदा मुख्यमंत्र्यांनी या 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील पालखी प्रमुख व सोहळा प्रमुख अशा प्रत्येकी दोघांना महापूजेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे .

Advertisement

इतर पालखी प्रमुख आक्रमक होणार?

दुसऱ्या बाजूला मंदिर महापूजेसाठी चौखांबी आणि सोळखांबीमध्ये 50 ते 60 भाविक थांबू शकतात. आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी राज्यातील आमदार खासदार, मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी असते. यातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत येणाऱ्यांची संख्या पाहता महापूजेस उपस्थित राहणाऱ्या व्हीआयपी संख्या 200 पेक्षा जास्त असते. अशावेळी गर्दीचा त्रास मोठ्या प्रमाणात मुख्य व्हीआयपी लोकांना सहन करावा लागतो.

इतर पालखी सोहळ्याचे प्रमुखही नाराज

आता गर्दीवर मर्यादा घालायच्या झाल्यास कोणाला घ्या आणि कोणाला नको हे सांगणे मुख्यमंत्र्यांना अवघड जाणार आहे. आता तर सामाजिक संघटनांनीही आम्हाला आषाढी महापूजेस उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यास सुरुवात झाल्याने यात वाईटपणा दोन्ही बाजूने मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागणार असून सोसावी लागणारी नाराजीचा फटका देखील लोकप्रिय निर्णयाच्या नादात सरकारला सोसावा लागणार आहे. आता इतर पालखी सोहळे देखील आक्रमक होण्यास सुरुवात झाली असून देवापाशी सर्व भक्त सारखे असल्याची भूमिका घेऊ लागले आहेत .

व्हीआयपींमुळे 15 लाख भाविकांवर अन्याय

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आषाढी एकादशी दिवशी व्हीआयपी दर्शन पासांची संख्या वाढली जाईल आणि दर्शन रांगेत 40 40 तास उभारणाऱ्या भविकाला आषाढीच्या पर्वणीला दर्शन मिळणे दुरापास्त होणार आहे. आषाढी एकादशीचा पर्वणी काळ हा दशमी रात्री दोन ते एकादशी रात्री 12 पर्यंत मानला जातो. अशावेळी केवळ 16 तासात दर्शनासाठी आलेल्या 15 लाख भाविकांवर हा थेट अन्याय ठरतो. खरेतर शासकीय पूजेचा वेळ कमी करून आणि व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केल्यास वाचणाऱ्या तीन ते चार तासात मिनिटाला 45 या वेगाप्रमाणे हजारो भाविकांना एकादशीच्या पर्वणीला दर्शन मिळू शकणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »