पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जण भुशी डॅममध्ये गेले वाहून, २ मृतदेह बाहेर काढण्यात यश
पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्याची भीती आहे. यामध्ये ४ लहान मुले आणि १ महिला यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी आहेत.
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल, जो रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो, तिथे हे अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. पाय घसरुन हे सर्वजण वाहून गेल्याची भिती आहे. धबधब्याचे पाणी भुशी धरणात येते. त्यामुळे तिथे पाच जणांच्या शोधकार्याला सुरुवात झाली आहे.
शिवदूर्ग मित्र आणि शहर पोलिसांच्या मदतीने शोधमोहिम राबवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आहे. शोधमोहिमेत प्रगत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या पाच जणांच्या शोधासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना घडताना, स्थानिकांनी आणि पर्यटकांनी ही दुर्घटना पाहिली. त्यांच्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या वेगामुळे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. या घटनेमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.