चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांची मांदियाळी; हरिनामाचा गजर अन् टाळ-मृदुंगाच्या गजरात अवघी दुमदुमली पंढरी
पंढरपूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
अवघे गर्जे पंढरपूर ।
चालला नामाचा गजर ॥
अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा आज बुधवारी भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे.
संतांच्या पालख्या मंगळवारी सायंकाळी तीर्थक्षेत्र पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. आज पंढरीत सुमारे 21 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.
श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार, पश्चिमद्वार, नगरप्रदक्षिणा मार्ग, वीर सावरकर पथसह भवताल गर्दीने फुलून गेला आहे. या भागांत व्यापार्यांनी दुकाने थाटली आहेत. अतिशय सुंदर मांडणी, आकर्षक वीज व्यवस्था, यामुळे मंदिर परिसरातील दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. प्रसाद, कुंकू-बुक्का, उदबत्ती, तुळशीच्या माळा, गोपीचंदन, टाळ, मृदंग, वीणा, तबला, बांगड्या, देवाचे फोटो, आध्यात्मिक ग्रंथ, चुरमुरे, पेढा-बर्फी आदींची दुकाने लक्षवेधी ठरत आहेत. याठिकाणी खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येत आहे. याशिवाय घोंगडी, सोलापुरी चादर अशा जिन्नसांची दुकानेही ग्राहकांच्या स्वागतास सज्ज आहेत. दरम्यान, मंगळवारी पालख्या वाखरीत दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. या अगोदर जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. या पावसामुळे भाविकांचा उत्साह दुणावला. राज्यासह परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त एसटी, रेल्वे, खासगी वाहनांसह पालख्या-दिंड्यांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मंगळवारी दशमी दिवशी चंद्रभागा नदीचे वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. चंद्रभागा किनारी उभारलेल्या तंबू, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान सुमारे 19 तासाचा कालावधी लागत आहे. एका मिनिटाला साधारणपणे 35 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. दर तासाला 45 हजार भाविकांना दर्शन मिळत आहे. आणखी दर्शन रांग पुढे पुढे सरकत चालली आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्तनिवास हाउसफुल्ल झाली आहेत. मठ, मंदिरातून भाविक भजन, कीर्तनात करण्यात दंग झाले आहेत. 65 एकर भक्तीसागरात 5 लाखाहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत.
वारीनिमित्त चंद्रभागा नदीत उजनी धरणातून मुबलक पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. वारीसाठी संपूर्ण पंढरपूर शहरासह आसपासच्या भागामध्ये मिळून सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. 300 हून अधिक सीसीटिव्ही कॅमेर्यांची करडी नजर पंढरपूरवर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्यावतीने आरोग्य विषयक सेवा बजावण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने वाखरी, तीन रस्ता, 65 एकर, गोपाळपूर दर्शन रांग येथे महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. येथेही लाखो भाविक औषधोपचाराचा लाभ घेत आहेत. चंद्रभागा स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीकडे येणार्या भाविकांमध्ये विठुमाऊलीच्या नामाचा उत्साह दिसून येत असून हात उंचावून जयघोष केला जात आहे. त्यामुळे वारकर्यांमध्ये उत्साह, नवचैतन्य संचारत आहे.
दर्शन रांगेत पाच लाख भाविक
पावसाने सुरुवातीलाच चांगली सलामी दिल्याने यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शन रांग आठ कि.मी. अंतरावर पोहोचली आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर गेली आहे. मंदिरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर दर्शन रांग पोहोचली आहे. दर्शन रांगेत 5 लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत.