यात्रा संपताच पंढरीच्या स्वच्छता कामांना वेगः चंद्रभागा स्नान, विठ्ठल दर्शन अन् नगर प्रदक्षिणा पूर्ण करत भाविक परतीला
पंढरपूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेचे स्नान, विठ्ठल दर्शन आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण करून मनोमन तृप्त झालेल्या वारकऱ्यांनी गुरुवारी परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला. सासरी नांदायला निघालेल्या माहेरवासिणींच्या गहिवरल्या मनस्थितीत’ जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता’, म्हणत परतीच्या मार्गाला निघाले. दुपारी दोन वाजेपर्यंत पंढरपूर सामान्य स्थितीला आले, एवढ्या झपाट्याने भाविकांची गर्दी ओसरून गेली.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर शहरात अभूतपूर्व गर्दी झाली होती. सुमारे १६ ते १८ लाख भाविकांची गर्दी झाल्याने पंढरी नगरी दुमदुमुन गेली होती. बुधवारी एकादशी सोहळा झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर मठ, मंदिरे, ६५ एकर आणि उपनगरी भागात दिंड्यां चे फड, चंद्रभागा वाळवंट हरिनामाच्या जयघोषाने भारावून गेले होते. गुरुवारी सकाळपासून द्वादशीचा उपवास सोडून भाविकांनी खाजगी वाहने, एस टी बसेस आणि रेल्वे मार्गे’ आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’, असे म्हणत परतीचा मार्ग धरला. वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही, अगदी सहज सर्व भाविकांची हजारो वाहने आपापल्या मार्गाने रवाना झाली.
बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी उसळली
होती. राज्य परिवहन महामंडळाने यंदा १० हजारहून अधिक बसेसची सोय केल्याने परतीच्या भाविकांना इच्छित
स्थळी जाण्यासाठी बसेस लगेच उपलब्ध झाल्या. बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी उसळली होती. राज्य परिवहन महामंडळाने यंदा १० हजारहून अधिक. बसेसची सोय केल्याने परतीच्या भाविकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बसेस लगेच उपलब्ध झाल्या.
पंढरपूर आषाढी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या
दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली
आहे आणि त्यासाठी १५०० कर्मचारी नियुक्त केले असल्याची
माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली. आ षाढी
सोहळ्यातील गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासूनच
२४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असून याकामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट,
प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये ३५० कायम तर ११५० हंगामी कर्मचारी काम करीत आहेत तसेच नदीपात्रातील पाण्याच्या पात्रा लगत पडलेल्या चिंध्या ही गोळा करायचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ४१ घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ६ टिपर, ३ कॉम्पॅक्टर, ६ डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज अंदाजे १०० ते १२५ टन कचरा उचलण्यात येत आहे.
चंद्रभागेत स्नान, संत नामदेव पायरीचे दर्शन, विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन, मुख दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करून वारकरी पुढील वर्षभरासाठी जगण्याची प्रेरणा घेऊन जातो. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्याच्या काना कोपऱ्यातून आणि देशाच्या विविध राज्यातून २५ लाखाहून अधिक भाविक पंढरीत येऊन गेले असावेत असा अंदाज आहे.