उसने घेतलेले ४७ लाख बुडविण्यासाठी मित्राचा खून
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) व्यावसायिक भागीदार असलेल्या विशाल दत्तात्रय बनसोडे याने मित्र रमण सातप्पा साबळे याचा खून केल्याची बाब तब्बल १५ महिन्यानंतर उघड झाली आहे. रमणकडून उसने घेतलेले ४७ लाख रूपये बुडविण्यासाठी विशाल बनसोडे याने मित्र रमणचा खून केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
सांगोला शहरातील देगाव रोडवरील लक्ष्मी पेठेतील ३६ वर्षीय रमण सातप्पा साबळे ११ एप्रिल २०२३ रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिसांत दाखल झाली होती. त्याचवेळी सांगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनकढाळ गावाच्या शिवारात नाझरा मठ ते राजुरीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून कुटे मळ्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील नालाबंडिंगच्या बांधालगत लिंगे यांच्या शेतात जळालेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळला होता. कोणीतरी जीवे ठार मारून अंगावर काहीतरी ओतून पेटवून देऊन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना होता. अनकढाळ येथील बाळासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरुन १४ एप्रिल २०२३ रोजी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करीत होते. सांगोला पोलिसांना मयताची ओळखही झाली नव्हती. फौजदार चावडी पोलिसांनाही त्या बेपत्ता व्यक्तीचा तपास लागलेला नव्हता. अशावेळी शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला आहे. सांगोला पोलिस तपास करीत आहेत.