लग्न करताय? मग, सावधान! ‘ही’ टोळी आपलीही करु शकते मोठी फसवणूक, काय आहे प्रकार?
मोहोळ -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) विवाहासाठी आपल्या भागात मुली मिळत नाहीत म्हणून जिल्ह्याबाहेर एजंटांकडून स्थळ शोधायचे, लग्न करायचे व मग बाहेरचे लोक फसवून लावून पळून जातात. असे प्रकार आता नवीन नाहीत; तरीही एकदाचे लग्न होऊ दे म्हणून लोक फसतात. असाच सव्वाचार लाखांचा ऐवज घेऊन पळाल्याचा प्रकार बारडवाडी (ता. राधानगरी) येथे घडला होता. त्यात फसवणूक करणाऱ्या तिघांना राधानगरी पोलिसांनी काल अटक केली.
याच टोळीने याच आठवड्यात मानेवाडी येथील एका कुटुंबाला पावणेदोन लाखाला गंडा घातला होता. लग्नानंतर नववधूसह दोन साथीदारांनी रोख रकमेसह सोन्याचे चार लाख १६ हजारांचे दागिने घेऊन पोबारा केला. याबाबतची तक्रार नवरदेवाचा भाऊ पांडुरंग गजानन बारड (रा. बारडवाडी, ता. राधानगरी) यांनी राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये दिली होती.
दरम्यान, याच टोळीने मानेवाडी येथे असाच गंडा घातला होता. याचा तब्बल चार महिन्यांनी छडा लागला. पोलिस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी नववधूसह दोघांना आज ताब्यात घेतले. रमेश बारड यांचा विवाह राधा देशमुख ऊर्फ सोनाली कोल्हाळ (रा. मोहोळ, जि. सोलापूर) हिच्याशी २६ एप्रिल रोजी झाला. यावेळी सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल (रा. नाईकवाडी वस्ती, जवाहरनगर, मोहोळ जि. सोलापूर) हे दांपत्य एजंट म्हणून उपस्थित होते.
लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूसह तिघेही घरातून पळून गेले. जाताना लग्नात दिलेले स्त्री-धन, सोन्याचे गंठण, टॉप, नेकलेस, मणी मंगळसूत्र, चांदीचे पैंजण, साड्या आदी सुमारे चार लाख १६ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याने पांडुरंग बारड यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकारापूर्वी आठवडाभर आधी याच तालुक्यातील नाथापा शामराव माने याचे याच युवतीशी लग्न लावून देत असाच सुमारे पावणेदोन लाखांचा हात या त्रिकुटाने मारला होता. माने यांनीही तक्रार दिली होती.
आणखी दोन प्रकार
असेच प्रकार या तालुक्यात आणखी दोन ठिकाणी घडले होते. एका प्रकरणात कर्नाटकामधील, तर दुसऱ्या प्रकरणात सोलापूर परिसरातीलच एका टोळीने लग्न लावून दिले होते व रातोरात दागिन्यांसह पलायन केले होते.