देवऋषी लोकांनो सावधान…काळी बाहुली, लिंबू-मिरची करणार त्याला पोलीस उचलणार


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) विज्ञाननिष्ठ पुरोगामी विचारांची चळवळ सक्रिय आहे. मात्र, अजूनही अंधश्रद्धेचा जाच संपला नाही. वर्षभरात किमान पाच-सहा घटना घडतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्याची गरज असतानाच प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले. पोलिस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी झाल्यास भानामती जादूटोणा करणाऱ्यांना यापुढे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास अनुमती प्रदान करण्यात आली. या शक्तीचा वापर करून, या अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये आंतरभूत केलेली कर्तव्ये पार पाडण्यास पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (गुन्हे) तसेच पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात निरीक्षकांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे.

 

दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती होणार..

Advertisement

जादूटोणा कायद्यांतर्गत प्रकरण हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच तक्रारीची अंमलबजावणी व गुन्ह्याचा तपास याबाबत तक्रारदाराला दक्षता अधिकाऱ्याकडे दाद मागता येणार आहे. आदेश मिळाल्यानंतर संबंधित कार्यवाहीला सुरुवात करण्याबाबत आदेशात नमूद आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षात पीडितांना आपल्या तक्रारी दाखल करता येईल.

पोलिस प्रशासनाचे आश्वासक पाऊल

• अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे एक आश्वासक पाऊल आहे.

• यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

• या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण देण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

“अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सतत प्रबोधन सुरूच आहे. समितीच्या गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली. मात्र, केवळ कक्ष स्थापन करून उपयोग काही नाही. पोलिसांचे व्यवस्थित ट्रेनिंग व्हावे. कायद्यातील तरतुदींची कडक अंमलबजावणी झाली तरच पीडित लोक आपल्या तक्रारी निर्भयपणे या कक्षाकडे दाखल करतील.”
– अनिल दहागावकर, जिल्हा संघटक अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »