पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती
पुणे -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे मोटारीने दिलेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. अगरवालला मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची याप्रकरणात चौकशी करण्यात आली. टिंगरे यांचा अपघात प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी योग्य पद्धतीने केला. पोलिसांच्या कार्यपद्धती, तसेच तपासाबाबत काहींनी शंका उपस्थित केली. समाज माध्यमात पोलिसांवर टीका करण्यात आली. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जी केली नाही. अपघात प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली. अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांचीही या प्रकरणात चौकशी झाली. टिंगरे यांनी पोलिसांवर दबाब आणला का नाही, हे आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र, टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरून तपास केला. तांत्रिक तपासावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून परिस्थितीजन्य, तसेच तांत्रिक पुरावे गोळा केले. साडेतीन महिन्यानंतर अपघात प्रकरणातील आरोपींना जामीन झाला नाही. यावरुन पोलिसांनी तपास योग्यरित्या केल्याचे सिद्ध झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.