धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर हातात द्या, आंदोलन थांबवतो


पंढरपूर- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि याची अंमलबजावणी झालेला जीआर आठ दिवसांत सरकारने आमच्या हातात द्यावा, तेव्हाच आम्ही आंदोलन थांबवू, असा आक्रमक पवित्रा घेत पंढरपूर येथे सकल धनगर समाजाने आंदोलन सुरूच ठेवले आहे.

धनगर समाजाची एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, रविवार, दि.15 रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती.

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी असलेली प्रत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी उपोषणस्थळी आंदोलकांना वाचून दाखवली. सदर प्रत उपोषणकर्त्यांना देण्यात आली. समाजासाठी आपण सुद़ृढ आणि व्यवस्थित राहणे गरजेचे आहे, असे म्हणत उपोषणकर्ते यांना उपोषण सोडण्याची विनंती डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी केली; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी सकल मराठा धनगर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणाचा जीआर काढण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी मागितला असल्याचे सांगितले. तेव्हा उपोषणकर्त्यांनी आम्ही सात दिवस नव्हे, तर आठ दिवस थांबतो; मात्र, आठव्या दिवशी आमच्या हातात धनगर समाज आरक्षणाचा जीआर द्या.

Advertisement

जीआर मिळेपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगीतले. आंदोलनकर्ते माऊली हळणवर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत धनगर आरक्षणाबाबत झालेले निर्णय आम्हाला मान्य आहेत. मात्र, आरक्षणाचा जीआर आमच्या हातात द्या. तेव्हाच आम्ही आंदोलन थांबवतो. एकतर आम्ही घरच्यांना सांगून आलो आहे, घरी आलो तर आरक्षण घेवूनच येणार अन्यथा माझ्या अस्थी चंद्रभागेत विसर्जित होतीत. त्यामुळे आम्ही अर्ध्यातून माघारी जाणार नाही. आरक्षणाचा जीआर हातात द्या, आम्ही घरी जातो, असे सांगीतले.

आंदोलनस्थळी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. विभागीय आयुक्तांबरोबर सोमवारी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने धनगर समाजाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या धनगर समाजातील कार्यकर्ता संजय नानासाहेब चौगुले (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर) याने विषप्राशन केले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आ. पडळकर, प्रकाश शेंडगेंकडून आंदोलन स्थगित करण्याची विनंती

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासमवेत निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते. आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही बैठकीत झालेल्या निर्णयाबाबतची माहिती यावेळी दिली. त्यानुसार आ. पडळकर व प्रकाश शेंडगे यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी हातात जीआर दिल्यानंतर आंदोलन थांबवू, असे स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »