दिलीप सोपलांच्या हाती मशाल, मातोश्री भेटीनंतर उमेदवारी फिक्स?


बार्शी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) शिवसेना पक्षात 2 गट पडल्यापासून तटस्थ भूमिकेत असलेल्या माजी मंत्री दिलीप सोपल यांनी अखेर अप्रत्यक्षपणे भूमिका जाहीर केली. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ते मातोश्री बंगल्यावर पाहायला मिळाले. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हेही सोपल यांच्यासमवेत मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी एकत्र होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. कारण, काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलीप सोपल यांना आमदार, मंत्री करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे विधान केले होते.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर दिलीप सोपल यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. तर, लोकसभा निवडणुकीत गत 40 वर्षांतील अनुभवाच्या आधारावर मी स्वतःच पक्ष, नेता असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी आजारी असतानाही त्यांनी प्रचारसभा घेऊन ओमराजेंसाठी खिंड लढवली. त्यामुळेच, खासदार निंबाळकर देखील लोकसभेची परतफेड करण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, विधानसभेला सोपल कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला असताना, आता सोपल यांनी मातोश्री भेटीतून मशाल हाती घेण्याचे निश्चित मानले जात आहे.

Advertisement

महाविकास आघाडीतील जागावाटपात बार्शीची जागा गतवेळेस शिवसेना पक्षाने लढवली होती. त्यामुळे, यंदा ही जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, बार्शी दौऱ्यात शरद पवार यांनी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांना तयारीला लागा असे सांगितल्याने त्यांचीदेखील तयारी सुरू आहे. पण, याच दौऱ्यात त्यांनी सोपल बंगला देखील राज्यभर चर्चेत आणला होता. त्यामुळे, सोपल यांनाही त्यांचा पाठींबाच असल्याचे मानले जात आहे.

बार्शीतील जागेवर गत 2019 च्या मतांचा विचार केल्यास सोपल यांचा दावा अधिक दिसून येतो. त्यामुळे, दिलीप सोपल यांनी मातोश्रीवर जाऊन आपली सीट पक्की केल्याची चर्चा मतदारसंघात आहे. तर, आमदार राजेंद्र राऊत यंदा भाजपच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, बार्शी मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होण्याची चिन्हे आहेत. तर, राष्ट्रवादीचे विश्वास बारबोले हे महाविकास आघाडीचा धर्म पाळून यंदा तरी दिलीप सोपल यांच्यासाठीच राजकीय मैदानात उतरतील, असेच दिसून येते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »