सत्ताधाऱ्यांना पाडणार की उमेदवार उभे करणार, अंतरवालीत बैठक सुरू?


जालना -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करायचे की सत्ताधाऱ्यांना पाडायचे? यावर मंथन करण्यासाठी मनोज जरांगे पाटीलयांनी मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक सुरू आहे. मराठा समाजाची ही निर्णायक बैठक सुरू आहे. जरांगे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची निर्णायक बैठक सुरू आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे याचा अंतिम निर्णय होणार आहे. आज, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक संपण्याचा अंदाज आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जरांगे यांच्याकडे राज्यभरातून 800 पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्जासह डाटा सादर केला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांनी शनिवारीदेखील बैठक बोलावली होती. मात्र, त्यात ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे, आज रविवारी होणाऱ्या बैठकीकडे काय निर्णय होणार हे महत्त्वाचे आहे.

निवडणुकीत जिंकणंच महत्त्वाचे नाही…

Advertisement

निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळवता येतो, असे काही नसते. आपल्याविषयी जो वाईट विचार करतो, आपल्या समाजविषयी द्वेष आहे, त्याला हरवणे सुद्धा विजय असतो. मला दिसत आहे, सर्व तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक या सर्वांचे मत एकच होते, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. समाजाची फसगत झाली नाही पाहिजे, आणि आपल्याला जे संपवायला निघाले आहेत, त्यांना संपवणे गरजेचे आहे. ज्यांनी आपल्याला संपवले त्यांना संपवण्यात देखील विजय असतो, असेही त्यांनी म्हटले. निर्णय चुकायला नको, या निर्णयामुळे समाज अडचणीत येता कामा नये. समाज हा राजकारण करण्यासाठी एक आला नव्हता, आम्ही समाज म्हणून केवळ आरक्षणाकरिता एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे, असे जरांगे यांनी शनिवारी म्हटले होते.

फडणवीस यांच्यावर टीकास्त्र…

मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जरांगे पाटील पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. जरांगे यांनी म्हटले की, फडणवीस यांना मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी पुरेपुर मराठ्यांचा कार्यक्रम लावला तो यशस्वी पण झाला. शेतीपासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाज एका अरिष्टात अडकला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या मतदानाची ताकद दाखवा असे आवाहनही त्यांनी केले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »