रमेश कदमांच्या कन्येला मोहोळमधून पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी


मोहोळ -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या सिद्धी कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. आता तो प्रत्यक्ष निवडणुकीत यशस्वी होतो का हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील राखीव असलेल्या मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक या मतदारसंघातून रमेश कदम हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांच्या कन्येला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

Advertisement

सिद्धी रमेश कदम यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये सोशल सायन्समध्ये पोस्ट ग्रज्युएशन केलेले आहे. त्यानी एनजीओ म्हणूनही काम केले आहे. सिद्धी कदम यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवारीच्या यादीत अकरा महिलांचा समावेश झाला आहे.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. मात्र, वर्षभरापूर्वी त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. पुढच्या राजकीय शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रमेश कदम यांच्याऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी दिली असू शकते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »