शरद पवारांचं माढ्यात धक्कातंत्र, बबनदादांना बाजूला करत रणजितसिंह मोहितेंना मैदानात उतरवणार, पंढरपूरचा उमेदवारही जवळपास निश्चित


मुंबई -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढा विधानसभा मतदारसंघात धक्कातंत्र वापरणार असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेल्या मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करताना पवार अनेकांना धक्का देतील, असं बोललं जात आहे.

महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे . माढ्यात आमदार बबनदादा शिंदे , अभिजीत पाटील या दोघांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना पवारांकडून वेगळा डाव टाकण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार शेवटी मोहिते पाटील यांच्यावरच विश्वास ठेवण्याची शक्यता असून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोहोळमध्ये रमेश कदम यांच्या कन्येला उमेदवारी

शरद पवारांची आज  तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात अपेक्षितपणे सिद्धी रमेश कदम या तरुणीला उमेदवारी जाहीर करत पवारांनी आपला धक्का तंत्र वापरले आहे. मोहोळमध्ये संजय शिरसागर , राजू खरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अशी नावे चर्चेत असताना आणि स्वतः माजी आमदार रमेश कदम यांनी उमेदवारी मागितली असताना पवारांनी थेट कदम यांच्या कन्येलाच उमेदवारी देत सर्वांना धक्का दिला आहे. एका बाजूला लाडक्या बहिणीच्या नावावर भाजप विधानसभेत उतरत असताना एका उच्चशिक्षित तरुणीला रिंगणात उतरवत पवारांनी अजितदादा गटाला धक्का दिला आहे.

Advertisement

तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना पंढरपूरमध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता

माढ्यात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेले पवार भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना माढ्याच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाकडून माढा विधानसभेचे दौरे आहेत. लोकसभेत विजय मिळवल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील खासदार देखील झाले आहेत. हे पाहाता शेवटच्या यादीत पवार माढ्यातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. याच पद्धतीने पंढरपूर विधानसभा मतदारसंघातही अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी काल प्रशांत परिचारक यांची समजूत घालण्यात भाजप यशस्वी झाली आहे. पंढरपूरमध्ये भगीरथ भालके व संतनाना देशमुख आणि अनिल दादा सावंत ही नावे चर्चेत आहेत. पंढरपूरसाठी ही पवार असाच धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनपेक्षित नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राची लॉटरी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना लागण्याची शक्यता आहे . भाजपचे आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग म्हणून ओळखले जाणारे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना तेवढ्याच ताकदीने तोंड देऊ शकणारा उमेदवार म्हणून अनिल सावंत यांच्याकडे पाहिले जात आहे. अशावेळी पवार हे पंढरपूरसाठी अनिल सावंत यांच्या नावाची घोषणा करू शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »