फडणवीसांचे कट्टर समर्थक आमदार शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार, धनुष्यबाणावर विधानसभा लढणार
मुंबई -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) अजित पवार यांची महायुतीत एन्ट्री झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. तीन पक्षांत जागावाटप करण्यासाठी शीर्षस्थ नेतृत्वास मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. त्यामुळे काही जागांची अदलाबदल तर काही ठिकाणी मित्रपक्षांच्या चिन्हावर उभे करण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे. इकडे बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत यांच्यावरही मित्रपक्षाच्या चिन्हावर उभे राहण्याची वेळ आली आहे. ते सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करतील.
बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत उद्या शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत सोमवारी दुपारी १२ वाजता राऊत यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत.
शिवसेनेच्या हक्काची जागा म्हणजे सोलापूर शहर मध्य यंदा भाजप लढवणार असल्याने बार्शीचे भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. दिलीप सोपल यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने बार्शीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे.
नीलेश राणे यांचाही शिवसेना प्रवेश
नीलेश राणे यांनी राजकीय तडजोड म्हणून भाजपला रामराम करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांच्याविरुद्ध मैदानात उतरतील.