बार्शीत विश्वास बारबोलेंची सोपलांनाच साथ
बार्शी- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघातही जागा कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, बार्शीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल, असा विश्वास बारबोलेंना होता. मात्र, अखेर, शिवसेना ठाकरे गटाकडून पहिल्याच यादीत दिलीप सोपल यांचे नाव जाहीर करण्यात आलंय. त्यानंतर, सोपल समर्थकांनी जल्लोष केला तर बारबोलेंच्या समर्थकांची निराशा झाली. त्यामुळे, बारबोलेंच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. आता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बारबोलेंनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत दिलीप सोपल यांच्यासमवेतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे तीन पक्ष असून महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार म्हणून दिलीप सोपल यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, आघाडी धर्म पाळत विश्वास बारबोले यांनी दिलीप सोपल यांच्यासोबतच आपण राहायचे ठरवले आहे. बारबोले कोट्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, माजी मंत्री दिलीप सोपल यांनीही त्यांची भेट घेऊन आघाडी धर्म पाळत राजकीय घडामोडींवर त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर, बारबोलेंनी सोपल यांच्यासमवेत जाण्याच्या निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, जागावाटपात ही जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनीही शेवटपर्यंत उत्सुकतेचा टेम्पो वाढवल्याचं दिसून आलं. जागा आम्हालाच सुटेल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत होता. पण, दिलीप सोपल नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत यांची उमेदवारी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.