महायुती कडून माढयाच्या नगराध्यक्षा ॲड. मिनलताई साठे यांना उमेदवारी जाहीर, माढा मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत
माढा -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडींना वेग आला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अखेर अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं महायुतीचा नेमका उमेदवार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, अखेर माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. माढ्याच्या विद्यमान नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या ऍडव्होकेट मिनलताई साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे.
माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्याच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड. मिनलताई साठे यांना महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. मिनलताई साठे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना डावलून शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळवलं आहे. त्यामुळं माढ्याच्या मैदानात आता तिरंगा सामना रंगणार आहे.