सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी! पंढरपूर मतदारसंघात भालकेंनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्यालाही मिळाली उमेदवारी
अकलूज -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) पंढरपुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. यामुळे आता पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वीच काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते आज अकलूज येथे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
अनिल सावंत हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात होते. त्यांनी पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती. दरम्यान, जागा वाटपामध्ये पंढरपूरची जागा काँग्रेसकडे गेली होती. इथून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळताच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यानंतर आता थेट शरद पवारांनी अनिल सावंत यांना मैदानात उतरवले आहे.