गोविंदबागेत शरद पवार अन् अजित पवारांची दिवाळी काटेवाडीत
बारामती- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंब एकत्र असल्याचे सांगण्यात येत होते. दरवर्षी शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय हे दिवाळीनिमित्ताने गोविंदबागेतील निवासस्थानी एकत्र येतात.
मात्र, यंदा हे चित्र दिसणार नाही. शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय हे गोविंदबागेत दिसणार असून उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे काटेवाडी येथील आपल्या घरी दिवाळी साजरी करणार आहेत.
पवार कुटुंबीयांसाठी दिवाळी सण खास असतो. कुटुंबातील व्यक्ती कुठेही असली तरी त्याने बारामतीमधील घरी एकत्र यावे, असा दंडक शरद पवार यांच्या आई शारदाबाई यांनी घालून दिला होता. राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्यानंतर शरद पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना पाडव्याच्या दिवशी भेटतात. या वेळी शरद पवार आणि पवार कुटुंबातून राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तींना भेटण्यासाठी गर्दी उसळते.
मागील वर्षी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी गोविंदबागेत आले होते. यंदा मात्र अजित पवार हे गोविंदबागेत यंदा पाडव्याच्या दिनी जाणार नाहीत. अजित पवार हे काटेवाडी येथील आपल्या निवासस्थानी पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुले पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे आता बारामतीमध्ये पाडव्याच्या दिनी आता काका-पुतण्यांमध्ये शक्तिप्रदर्शन होणार असल्याची चर्चा आहे.
कुटुंबात एकटे पडल्याची भावना..
अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका सभेत बोलताना शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर आपण कुटुंबात एकटे पडलो असल्याची भावना व्यक्त केली होती. आपल्यासोबत आता फक्त माझे कुटुंबीय आहे, असे अजित पवारांनी म्हटले.
विधानसभेत काका-पुतण्याची लढाई
बारामती लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना जवळपास 48 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत काय होईल, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार यांनी युगेंद्र यांच्यासाठी कान्हेरी गावात झालेल्या पहिल्या प्रचार सभेत अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. पवार यांच्या भाषणाने अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे दिसून आले.