माढा, करमाळा विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार; मतदारांची डोकेदुखी वाढणार
टेंभूर्णी -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असते, असे म्हणतात. आता युद्ध म्हणजे निवडणुका असेच दिसू लागले आहे. निवडणुकीत समोरच्याला पराभूत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. नावात साधर्म्य असलेले उमेदवार, निवडणूक चिन्हातील साधर्म्य यासह विविध फंडे निवडणुकीत डोकेदुखी वाढवून जातात.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा फड आता रंगू लागला आहे. करमाळ्यात आणि माढ्यात सारख्या नावाचे अनेक उमेदवार मैदानात असल्याने सेम नेमची शक्कल कोणाची? सेम नेमचा फॉर्म्युला कोणाचा गेम करणार? या बद्दल उत्सुकता लागली आहे.
करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात तीन संजय शिंदे मैदानात उतरले आहेत. दहिगाव (ता. करमाळा) येथील संजय वामन शिंदे हे बसपकडून मैदानात आहेत. खांबेवाडी (ता. करमाळा) येथील संजय लिंबराज शिंदे, चिंचगाव (ता. माढा) येथील संजय विठ्ठल शिंदे हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले आहेत.
यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांचा नाम साधर्म्यामुळे २५०० मतांनी पराभव झाला. त्या निवडणुकीत संजय शिंदे नावाच्या इतर उमेदवारांनी जवळपास पाच हजार मते घेतली होती. या निवडणुकीनंतर आमदार शिंदे यांनी स्वत:चे नाव कागदोपत्री संजयमामा करून घेतले आहे.
माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित धनंजय पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात तब्बल तीन अभिजित पाटील माढ्याच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. माढ्यासाठी बसपने अभिजित धनवंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अभिजित तुळशीराम पाटील व अभिजित अण्णासाहेब पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी या निवडणुकीत त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात रंजित मारुती शिंदे, रणजितसिंह शिवाजीराव कदम हे नाम साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार आहेत.
सोमवारी होणार चित्र स्पष्ट
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (ता. ४) हा अंतिम दिवस आहे. यादिवशी माघार आणि निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. नावात साधर्म्य असलेले किती उमेदवार मैदानात राहतात आणि किती उमेदवारांना सारखे दिसणारे चिन्ह मिळते? याबाबतची स्पष्टता सोमवारीच होणार आहे. शिट्टी आणि कुकर, टेबल व कॉट, ट्रॅक्टर व बुलडोझर या चिन्हांमुळे मतदारांमध्ये गोंधळ होत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत सिद्ध झालेले आहे. नाव साधर्म्याच्या गेमनंतर आता चिन्हांमध्येही अशीच गेम होणार का? या बद्दल मोठी उत्सुकता लागली आहे.