हर्षवर्धन पाटील यांच्या चुलत बंधूंचा प्रवीण माने यांना पाठिंबा


इंदापूर- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी इंदापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या ‘परिवर्तन विकास आघाडी’त प्रवेश करून माने यांना पाठिंबा जाहीर केला.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार आहे. महायुतीचे उमेदवार, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढे भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आव्हान असणार आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झाल्याने सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी ‘परिवर्तन विकास आघाडी’च्या माध्यमातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी पाटील यांचे नात्याने मामा असलेले, पुणे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनीही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. जगदाळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. विविध पदांवर काम केलेल्या नातेवाइकांनी पाटील यांची साथ सोडल्याने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पाटील यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

लोकनेते, माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील माझे काका आहेत. त्यांचे काम उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. अलीकडच्या काळात तालुक्यात त्यांच्या विचारांनुसार काम होत नसल्याने वैचारिक आणि राजकीय घुसमट होत होती. त्यामुळे तालुक्यातील लोकांच्या भविष्याचा विचार करून सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देणारे प्रवीण माने यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या ‘परिवर्तन विकास आघाडी’त प्रवेश करत आहे. विधानसभा निवडणुकीला माने यांना माझा पाठिंबा असेल,’ असे मयूरसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »