पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे, सोलापूरमध्ये सभा


सोलापूर -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर आणि पुणे येथे दोन सभा मंगळवारी होणार आहेत.

या दोन्ही सभांसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपाइंचे मंदार जोशी, माध्यम समन्वयक अमोल कविटकर यावेळी उपस्थित होते.

Advertisement

तर या सभेसाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील सभेसाठी उपस्थित असणार आहेत. यावेळी बोलताना पांडे म्हणाले की, सोलापूर येथील सभा सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी होणार आहे. ही सभा झाल्यानंतर सायंकाळी साडे चार वाजता पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होईल. या सभेला पुणे आणि सातारा जिल्ह्यातील मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहातील.

मतदारसंघात निमंत्रणाचे वाटप

या सभेच्या निमित्ताने भाजपकडून शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात पुढील दोन दिवसात शहरातील दीड लाख घरांमध्ये सभेचे निमंत्रण वाटप केले जाणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान ५ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »